आदिवासी बांधवांसाठी विकासवाटा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२१ । सातारा । जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रमातंर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावच्या कार्यक्षेत्रात अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी शासनाच्यावतीने योजनेच्या माध्यमातून सामाजिक कल्याण, आर्थिक कल्याण, शिक्षणामध्ये प्रगती, सामाजिक न्याय, महिला व बाल विकास, आरोग्य, पोषण, रोजगार इत्यादीबाबत योजना राबविण्यात येतात. लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवाचे जीवनमान उंचाविण्यास मदत होत असून या योजना आदिवासी बांधवांसाठी विकासवाटा ठरल्या आहेत.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतक-यांना नवीन विहिर खोदणे, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळी प्लास्टीक अस्तरीकरण, वीज जोडणी,  पंप  संचामध्ये मध्ये इलेक्ट्रिक व डिझेल पंप, पीव्हीसी एचडीपी पाईप, इनवेल बोअरींग, किचन गार्डन व सूक्ष्म सिंचन या बाबीसाठी अनुदान रु.10 हजार ते 2 लाख 50 हजारापर्यंत उपलब्ध करुन देण्यात येते. ही योजना जिल्हा परिषद, कृषी विभाग यांचे मार्फत राबविण्यात येते.

या योजनेतंर्गत सन 2019-20 या वर्षामध्ये 131 लाभार्थ्यांना नवीन विहीर, 3 लाभार्थ्यांना पंपसंच  आणि 3 लाभार्थ्यांना शेततळे प्लास्टीक अस्तरीकरण असे एकूण 137 आदिवासी नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. सन 2020-21 या वर्षामध्ये निवड प्रक्रीया पूर्ण झालेली असून लाभ देण्याची प्रक्रीया सुरु आहे.

गायी/म्हशीचा गटाचा पुरवठा करणे या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 2 दुधाळ जनावराचा 1 गट वाटप केले जाते. 1 गट वाटप करताना रुपये 63 हजार 796 इतके अनुदान देण्यात येत असून उर्वरीत आवश्यक रक्कम लाभधारकाचा हिस्सा म्हणून उपलब्ध करुन दयावी लागते. ही योजना जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, यांचेमार्फत राबविण्यात येते. योजनेतंर्गत सन 2019-20 या वर्षामध्ये 78 लाभार्थ्यांना व सन 2020-21 मध्ये 67 लाभार्थ्यांना गायी गटाचा पूरवठा करण्यात आला आहे.

अनुसूचित जमातीच्या लोकांना शेळी गटाचा पुरवठा करणे ही योजनादेखील रोजगार मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.  अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याना 10 शेळया व 1 बोकड गट उपलब्ध करुन दिला जातो. उस्मानाबादी/संगमनेरी शेळी जातीसाठी रुपये 71 हजार 239 व अन्य स्थानिक शेळीच्या जातीसाठी रुपये 47 हजार 848 अनुदान देण्यात येते. ही योजना जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात येते. सन 2019-20 या वर्षामध्ये 91 लाभार्थ्यांना व 2020-21 मध्ये 78 लाभार्थ्यांना शेळी गटाचा पूरवठा करण्यात आला आहे.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार  योजनेच्या माध्यमातून  अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी/मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर व स्तनदा मातांना आहारातून उपयुक्त प्रथिनांची उपलब्धता होण्यासाठी एक वेळ चौरस आहार व 7 महिने ते 6 वर्षाच्या बालकांना आठवडयातून 4 दिवस अंडी व केळी अथवा स्थानिक फळे उपलब्ध करुन देण्यात येतात. ही  योजना जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी महिला बालविकास यांच्यामार्फत राबविण्यात येते. 2019-20 या वर्षामध्ये 1 हजार 121 गरोदर मातांना व 7 महीने ते 6 वर्षाच्या 6 हजार 922 बालकांना या योजनेतून लाभ देण्यात आला आहे.  सन 2020-21 या वर्षामध्ये 1 हजार 343 गरोदर मातांना व 7 महीने ते 6 वर्षाच्या 8 हजार 334 बालकांना लाभ देण्यात आला आहे.

याशिवाय विकासाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचा जीवनस्तर उंचावण्याचे प्रयत्न होत आहेत. आश्रमशाळांच्या माध्यमातून चांगले शिक्षण देण्यात येत आहेत. शिक्षण आणि रोजगाराच्या संधीमुळे अनुसूचित जमातीच्या नागरिकांचा एकूण विकास प्रक्रीयेत सहभागी होणे शक्य झाले आहे.

– जिल्हा माहिती कार्यालय, पुणे


Back to top button
Don`t copy text!