दैनिक स्थैर्य । दि. ९ जुलै २०२१ । सोलापूर। हिप्परगा तलाव सोलापूर शहराच्या नजीक असल्याने याठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आढळतात. उजनी धरणाप्रमाणे याठिकाणी सुशोभीकरण करून पक्षी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सामाजिक वनीकरण, वन विभाग आणि मेतन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, उपविभागीय अभियंता प्रकाश बाबा, शाखा अभियंता शिरीष जाधव, उत्तर सोलापूरचे तहसीलदार जयवंत पाटील, वनक्षेत्रपाल जयश्री पवार, तुकाराम जाधवर, मेतन फाऊंडेशनचे डॉ. व्यंकटेश मेतन, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी आदी उपस्थित होते.
हिप्परगा तलाव येथे अडीच एकर परिसरात सुशोभिकरण करून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. हा तलाव पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. इथले विश्रामगृह विकसित करून बगीचा तयार करा. शेतकऱ्यांच्या अडचणी, नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही श्री. भरणे यांनी संबंधितांना दिल्या.
यावेळी श्री. भरणे यांच्या हस्ते विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.