कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध – पालकमंत्री उदय सामंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सिंधुदुर्गनगरी, दि. 19 : जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन बैठक हॉलमध्ये आज पालकमंत्री उदय सामंत यांनी बांधकाम कामगार संघटनेसोबत बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.

यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त, रत्नागिरीचे विश्वास जाधव, जिल्हा कामगार अधिकारी आर.बी. टेंबुलकर, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, निरीक्षक किरण कुबल, कामगर संघटनेचे बबन नांदोसकर, संतोष झारापकर, रवींद्र सावकर. काशिराम वाईरकर, दीपक गावडे, अशोक बावलेकर आदी उपस्थित होते.

कामगारांची 8 कोटी 60 लाख 3 हजार 300 रुपयांची थकबाकी लवकरच देण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, शासनातर्फे कामगारांना दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात 21 हजार बांधकाम कामगार आहे. त्यातील 6 हजार कामगारांना 2 हजार रुपयांचे अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. उर्वरीत कामगारांपैकी 8 हजार कामगारांना येत्या दोन दिवसात अर्थसहाय्य देण्यात येईल तर 6 हजार कामगारांना येत्या 8 ते 10 दिवसात हे अर्थसहाय्य मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले.

जिल्ह्यात काही दलाल कामगारांना नोंदणी, अर्थसहाय्य मिळवून देण्याचे सांगून फसवणूक करत असल्याची कामगार संघटनांची तक्रार असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, याविषयी जिल्हा कामगार अधिकारी यांनी अशा दलालांवर कडक कारवाई करावी, लोकप्रतिनिधी आणि संघटना यांच्या मार्फत येणाऱ्या व्यक्तींचीच कामगार म्हणून नोंदणी करावी, दलालांतर्फे कोणत्याही कामगाराची नोंदणी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कामगारांचे इतर जे काही प्रश्न आहेत त्याविषयी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात  येतील. जिल्ह्यात काही ग्रामसेवक जाणीवपूर्वक कामगारांची नोंदणी करण्यामध्ये टाळाटाळ करत आहेत. तसेच कामगार नोंदणीमध्ये सहकार्य करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सहकार्य करत नसलेल्या ग्रामसेवकांना योग्य ती समज द्यावी अशा सूचना ग्राम पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांना यावेळी दिल्या.

शेवटी सर्व कामगारांना न्याय देण्याची आपली भूमिका असल्याचे स्पष्ट करून कामगारांच्या समस्या लवकरच सोडवल्या जातील असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!