
स्थैर्य, फलटण, दि. २२ सप्टेंबर : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त लायन्स क्लब फलटण आणि माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवरात्र व दसरा महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. आज, सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी देवीचा अभिषेक आणि घटस्थापनेने या महोत्सवाला प्रारंभ झाला. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
माळजाई मंदिर व उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी या महोत्सवाची तपशीलवार कार्यक्रम पत्रिका जाहीर केली आहे. दररोज सायंकाळी ७ वाजता देवीची महाआरती होणार आहे. महोत्सवाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये दि. २३, २४ आणि २५ सप्टेंबर रोजी अनुक्रमे शिवरुद्र झांजपथक, श्रीराम झांजपथक आणि रुद्रावतार झांजपथक यांच्या ढोल-ताशा वादनाचे आयोजन करण्यात आले आहे, जे सायंकाळी ८ ते ९ या वेळेत होईल.
महोत्सवात दांडिया आणि गरब्याचे खास आकर्षण असणार आहे. दि. २६, २७ आणि २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ ते ९ या वेळेत ‘ओपन दांडिया व गरबा’ ठेवण्यात आला आहे. रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी भोंडला, उपवासाचे फराळ स्पर्धा आणि नवरंग साडी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता होम-हवन विधी होणार आहे. बुधवार, दि. १ ऑक्टोबर रोजी पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्यातर्फे महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. महोत्सवाची सांगता गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त पारंपरिक दसरा महोत्सवाने होईल. या सर्व कार्यक्रमांमध्ये फलटणकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.