अर्ज, आंदोलने करूनही कारवाई शून्य; राजाळे येथील युवकाचा तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

राजाळे येथील रस्ता अतिक्रमणामुळे बंद; प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिक संतप्त


स्थैर्य, फलटण, दि. ०५ ऑगस्ट : फलटण तालुक्यातील राजाळे येथील जानाई ते सरडे हा सार्वजनिक रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाला असून, गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासन कारवाई करत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या प्रकरणी प्रशासकीय दिरंगाईच्या निषेधार्थ, अर्जदार निखिल तानाजी निंबाळकर यांनी दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी फलटण तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

राजाळे येथील गट नंबर ६२६ व ६२७ लगतच्या शासकीय आणि ग्रामपंचायतच्या जागेवर एका खाजगी विकासकाने अतिक्रमण करून गाळे बांधले आहेत, ज्यामुळे सार्वजनिक रस्ता बंद झाला आहे. अर्जदार निंबाळकर यांनी १० जून २०२२ पासून ग्रामस्थांच्या सह्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या अतिक्रमणाविरोधात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करून अतिक्रमणाचा नकाशा व अहवाल तहसीलदारांना सादर करण्यात आला होता.

जिल्हाधिकाऱ्यांनी १४ जून २०२३ रोजी अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्याचे आदेश देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. केवळ कोणाचेतरी हितसंबंध या जागेत असल्यामुळे आणि राजकीय दबावामुळे प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप निंबाळकर यांनी आपल्या निवेदनात केला आहे.

तीन वर्षांपासून अर्ज, स्मरणपत्रे, वर्तमानपत्रांतील बातम्या आणि आत्मदहनाचे इशारे देऊनही प्रशासनाने कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे येत्या १५ ऑगस्टपर्यंत अतिक्रमण काढले नाही, तर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे निंबाळकर यांनी म्हटले आहे. यानंतर घडणाऱ्या कोणत्याही अनुचित प्रकारास जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!