स्थैर्य, निमसोड (जि. सातारा), दि.११ : माण-खटाव तालुक्यातील युवा नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. मुंबईतील गांधी भवन ( मंत्रालयाशेजारी) या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कॉंग्रेसपक्षातील दिग्गज नेतेमंडळीच्या उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम होणार आहे.
यापूर्वी रणजितसिंह देशमुख हे सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. २००७ साली जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर विकासकामे करत काँग्रेस पक्षाची पाळेमुळे घट्ट केली. देशमुखांनी पाणी परिषदा, संघर्ष पदयात्रा ,जनजागृती अभियानाद्वारे दुष्काळी भागासाठी सिंचन योजना कार्यान्वीत होण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. कायम दुष्काळी माणदेशातील जनतेच्या आर्थिक परिवर्तनासाठी रचनात्मक कामांची उभारणी करणारे भक्कम नेतृत्व म्हणून नावारूपाला आले. महाराष्ट्रातील सहकारी सुतगिरणी व्यवसायाला नवी दिशा देणारे रणजितसिंह देशमुख यांची कल्पकता दिशादर्शक ठरताना दिसत आहे.
फिनिक्स ऑर्गनायझेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून माण-खटाव या दुष्काळी तालुक्यातील अनेक गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचे काम करत जलसंधारणाची कामे पूर्ण करून वृक्ष लागवड कार्यक्रमही राबविला. तसेच महिला व युवकांना स्वयंम रोजगार प्रशिक्षण, स्वंयम सहाय्यता गटांची निर्मिती आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे आदी उपक्रम सुरू केले आहेत. मध्यंतरीच्या काळात काँग्रेसमधील अंतर्गत कलहातून त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. तद्नंतर आपल्या राजकीय हितसंबधांचा उपयोग करून देशमुख यांनी गत दुष्काळात दोन्ही तालुक्यात सुमारे ७० चारा छावण्या सुरू करून दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा दिला होता. सिंचन योजनेद्वारे कातरखटाव परिसरात शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा जटील प्रश्न मार्गी लावला. परंतु, काँग्रेस विचारधारेचा पगडा असलेले रणजितसिंह देशमुख कोठेही फारसे रमले नाहीत.
२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय उलथा- पालथीमध्ये त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे उभा केलेल्या उमेदवाराचा प्रचार केला होता. तेव्हापासून ते अधिकृतपणे कोणात्याच राजकीय पक्षात सक्रिय नव्हते. दरम्यानच्या काळात काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी रणजितसिंह देशमुख यांना गळ घातली. विशेषत: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी प्रथम पासूनच असलेली रणजितसिंह देशमुख यांची जवळीक सर्वज्ञात आहे. जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आग्रह धरून रणजितसिंह देशमुख यांना काँग्रेस पक्षात सक्रिय करण्याची विनंती केली.
पृथ्वीराज बाबांशी झालेल्या समक्ष भेटीनंतर रणजितसिंह देशमुख यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित झाला. बुधवारी सकाळी ११ वाजता काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यातील काँग्रेसचे मंत्री, वरिष्ठ नेते यांच्या उपास्थितीत रणजितसिंह देशमुख काँग्रेस पक्षात स्वगृही प्रवेश करणार आहेत. नुकतेच जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या पक्ष प्रवेशानंतर रणजितसिंह देशमुख यांच्या पक्ष प्रवेशामुळे माण-खटाव विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्ष निश्चितच भरारी घेईल. तसेच सातारा जिल्ह्यातही त्यांच्या या कॉंग्रेस प्रवेशाने पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेईल, असा आत्मविश्वासही जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.