दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२४ | फलटण | विधानसभा निवडणुकीसाठी आज म्हणजेच मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी फलटण येथील तहसीलदार कार्याकायात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि.29 आॉक्टोबर आहे. शनिवार, रविवारी सार्वजनिक सुट्टी यामुळे अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना सहा दिवसांचा अवधी आहे; अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी तथा फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाने नामनिर्देशन व्यवस्थापन, ईव्हीएम व्यवस्थापन व यंत्रांचे वितरण, पोस्टल बॅलेट, ईडीसी पथक, निवडणूक साहित्य वाटप पथक, मतदार यादी व्यवस्थापन, मतदार मदत कक्ष व तक्रार निवारण कक्ष, जनसंपर्क व प्रसिद्धी कक्ष, एक खिडकी कक्ष, स्वीप व्यवस्थापन अशा विविध पथकांचे समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विधानसभा मतदारसंघात फिरती पथके (एफएसटी) आणि स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी), व्हिडिओ सर्वेक्षण पथके (व्हीएसटी), व्हिडिओ पाहणी पथकांचा (व्हीव्हीटी) समावेश आहे.