
स्थैर्य, 2 जानेवारी, कराड : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे येऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दादांच्या अकाली निधनाने केवळ माझ्या वैयक्तिक आयुष्यावरच नाही, तर महाराष्ट्राच्या हृदयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तथापि, त्यांनी मला दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रती असलेली प्रामाणिक बांधिलकी हेच माझे खरे आधारस्तंभ आहेत. अजित दादांनी आपले आयुष्य शेतकरी, कष्टकरी, महिला आणि तरुणांना अस्तित्वाचा मंत्र देण्यासाठी वेचले. हा वारसा पुढे नेताना मी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर अढळ निष्ठा ठेवून काम करेन, असे त्यांनी सांगितले.
स्मृतिस्थळावरून परत जात असताना वाटेत थांबलेल्या महिलांना त्यांनी हात जोडून नमस्कार केला. सुनेत्रा पवार यांच्या चेहऱ्यावरील भाव अत्यंत गंभीर होते. प्रीतिसंगमावरून थेट त्या वेणूताई चव्हाण ट्रस्टकडं रवाना झाल्या.
आशीर्वाद द्यावा, असा भावनिक संदेश
वेणूताई चव्हाण स्मृति सदनाची आणि ग्रंथालयाची त्यांनी पाहणी केली. ‘आशीर्वाद द्यावा’, असा भावनिक अभिप्राय त्यांनी ग्रंथालयातील वहीत नोंदवला. सदनाच्या प्रवेशद्वारावराच्या भिंतीवर यशवंतरावांच्या इच्छापत्रातील मजकूर कोरण्यात आला आहे. त्यामागील यशवंतरावांच्या भावना काय होत्या आणि स्मृतिसदन उभारण्यासाठी यशवंतरावांनी पैशाची तरतूद कशी केली होती, त्याबद्दलची सविस्तर माहिती माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुनेत्रा पवारांना दिली.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. ते वारंवार कराड येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करत होते. त्यांची आठवण यावेळी उपस्थितांना झाली.

