दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजनास मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये कृष्णा खोरेचे सचिव, कार्यकारी संचालक, जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी कृष्णा खोरे प्रकल्पाचे फेर जलनियोजन करण्यात आले आहे.
माढा मतदार संघातील विविध विकासकामे व मतदारसंघातील पाणीप्रश्नावर दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी आग्रही भूमिका घेणारे आ. जयकुमार गोरे व सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे वरील प्रश्नासंदर्भात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजनास मान्यता द्यावी व दुष्काळी भागातील ज्या वंचित गावांना कोणत्याही योजनेतून पाणी उपलब्ध होऊ शकत नाही, अशा गावांना फेर जलनियोजनातून या सिंचन प्रकल्पातून पाणी द्यावे, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती. त्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मान्यता देऊन माढा लोकसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव या गावांना वसना ०.५२ (अर्धा) टीमसी, वंगना योजनेतून ०.५९ (अर्धा) टीमसी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उत्तर कोरेगावच्या जनतेला पाणी देण्याचा मार्ग सुकर झाला आहे व या भागातील योजना मार्गी लागतील. जिहे-काठापूर योजनेतून २.५७ टीएमसी असे एकूण ३.६९ टीएमसी व टेंभू प्रकल्पातून माण-खटाव तालुक्यातील वंचित दुष्काळी ४८ गावांना २.५० टीमसी व सांगोला तालुक्यातील ४१ गावांना २ टीमसी या योजनेतून पाणी मिळणार आहे. म्हणजेच माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी व वंचित गावांना ८.१८ टीएमसी पाणी मिळणार आहे. भविष्यात माढा लोकसभा मतदार संघातील कोणतेही पाणी योजना व कोणतेही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही, अशी काळजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली व मतदार संघातील जनतेला दिलेला पाण्याचा शब्द पाळला आहे. मी या सरकारचे मनापासून अभिनंदन करणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीत मी शब्द दिला होता की, यानंतर माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये पाणी प्रश्नावर निवडणूक होणार नाही.
या मतदारसंघातील सर्व प्रश्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत व राज्य सरकार यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मग नीरा-देवघर, धोम बलकवडी, जिहे कटापूर, टेंभू विस्तारित पाणी योजना, माढा, करमाळा, पाणी योजना मी सर्व लोकप्रतिनिधी, भाजप व शिवसेना पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. आता या सर्व कामांची टेंडर झालेली आहेत. काही कामे सुरू आहेत. लवकरच मतदार संघामध्ये या सर्व पाणी योजनांचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व महाराष्ट्राच्या सर्व मंत्रिमंडळाच्या उपस्थितीमध्ये घेण्याचा माझा मानस आहे व राहिलेले प्रश्न आता जनतेच्या आशिर्वादाने सोडवायचे आहेत, असे हे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.