दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२३ । मुंबई । नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील खुतमापुर येथे विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात सदस्य जितेश अंतापूरकर, अशोक चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना प्रथम आर्थिक मदत म्हणून 20 हजार रुपये मदत देण्यात आली आहे. या कुटुंबीयांनी वारसाहक्क प्रमाणपत्र सादर केल्यानंतर उर्वरित नुकसान भरपाईची मदत तातडीने देण्यात येईल. तसेच या अपघात प्रकरणी विद्युत निरीक्षक नांदेड यांनी घटनास्थळी पाहणी करून अपघात प्रकरणी महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा अहवाल दिला आहे. त्यानुसार संबंधितांना निलंबित करण्यात आले आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.