वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२३ । मुंबई । वीज निर्मितीकरिता लागणारे कोळशाचे दर वाढले आहेत. वीज दर ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाकडे नसला, तरीही शासन वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबाबत विधानसभा सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वीज वितरण परवानाधारक कंपनीस आपल्या कंपनीच्या कार्यक्षेत्रातील ठराविक भागांचा वीज वितरण कारभार सांभाळण्यासाठी फ्रेंन्चाइझी नियुक्ती करण्याची तरतूद आहे. ज्या विभागांत वीज गळतीचे प्रमाण जास्त आहे, वीज बिल वसुलीचे प्रमाण कमी आहे तसेच वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, अशा व इतर सर्वसमावेशक बाबींचा विचार करुन असे विभाग फ्रेंन्चाइझी तत्वावर खाजगी कंपनीस ठराविक कालावधीकरिता देण्याचा धोरणात्मक निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे. त्यानुसार महावितरणच्या भिवंडी मंडळांतर्गतची विद्युत वितरण व देखभाल व्यवस्था मे. टोरंट पॉवर कंपनी लिमिटेडला वितरण फ्रेंन्चाइझी म्हणून हस्तांतरित करण्यात आलेली आहे.

वीज मीटर रीडिंग घेणारे कंत्राटदार कर्मचारी यांना ड्रेस कोड ,ओळखपत्र देण्याच्या सूचना संबंधित कंपनीला देण्यात येतील.कंत्राटदार कर्मचारी जबरदस्ती करीत असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच रमजान सणाला लोडशेडिंग करण्यात येऊ नये अशा सूचनाही देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य अबू आझमी,मुक्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिफ,अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!