दैनिक स्थैर्य । दि. १३ मार्च २०२३ । मुंबई । अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याबद्दल महानुभाव पंथाचे महंत व शिष्टमंडळाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
महानुभाव पंथाचे महंत व शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महानुभाव पंथाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी महंत मोहनराज दादा अमृते, महंत विद्वांस बाबाजी, महंत चिरडे बाबाजी, महंत कापूसतळणीकर बाबाजी, माजी आमदार बाळासाहेब सानप, गटनेते दिनकर अण्णा पाटील, प्रकाश ननावरे, ज्ञानेश्वर आंधळे,
प्रभाकर भोजणे,नंदू हांडे व ज्ञानेश्वर निमसे व मान्यवर उपस्थित होते.
अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे महानुभव पंथाचे प्रमुख केंद्र असून मराठी साहित्याच्या विकासात या ठिकाणाचे महत्त्वाचे योगदान आहे. रिद्धपूरचे हे महत्व लक्षात घेऊन या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याने सर्वच स्तरातून आनंद व्यक्त होत असल्याची भावना शिष्टमंडळातील सदस्यांनी यावेळी व्यक्त केली.