उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर रशिया दौऱ्यावर रवाना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ सप्टेंबर २०२२ । मुंबई । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच तैलचित्राचे अनावरण अशा दोन कार्यक्रमांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर हे काल रात्री रशिया दौऱ्यावर रवाना झाले. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे हे सुद्धा या दौर्‍यात सहभागी आहेत.

या दौऱ्यात आज, दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी देवेंद्र फडणवीस हे रशियातील भारतीय समुदायासोबत एका कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधतील. दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर, मॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे ते लोकार्पण करतील, तर त्याचदिवशी सायंकाळी मॉस्कोतील भारतीय दुतावासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण करतील. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद लोमोनोसोव्ह मॉस्को युनिव्हर्सिटी, द इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडिज ऑफ द रशियन अ‍ॅकडमी ऑफ सायन्स, रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज, पुश्किन रशियन लँगवेज इन्स्टिट्युट, सेंट पिटसबर्ग युनिव्हर्सिटी अशा अनेक संस्था या आयोजनात सहभागी आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत-रशिया संबंधांची ७५ वर्षे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे रशियातील वास्तव्य आणि त्यांच्या साहित्याचा रशियात असलेला प्रभाव, असे सर्व योग साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय काही उद्योजक आणि कंपन्यांसोबत सुद्धा महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या अनुषंगाने या दौर्‍यात भेटीगाठी होणार आहेत.

यापूर्वी लंडनमधील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, जपानमधील विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अशा कार्यक्रमांसाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे त्या-त्या देशांमध्ये गेले होते. आता अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक रशियात होत असल्याने महाराष्ट्रासाठी हा मोठा गौरवाचा विषय आहे आणि त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!