मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२१ । पुणे । कोरोनाचे संकट अजूनही कायम असून कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम नागरिकांनी पाळले पाहिजेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुणे विभागीय कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, आमदार दिलीप मोहिते, ॲड. अशोक पवार, सुनील शेळके, भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, राहूल कुल, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

श्री. पवार यावेळी म्हणाले, जिल्ह्याने कोविड लसीकरणाचा 1 कोटी डोसेसचा टप्पा पूर्ण केला आहे. 83 टक्के लोकांनी पहिला डोस व 44 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. पुणे ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित रक्तदान शिबिरात 1440 पिशव्या रक्त संकलन होणे ही समाधानाची बाब आहे. अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. दोन डोस मधील अंतर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्बंध शिथील करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना खेळाडूंप्रमाणे जलतरण तलावात सराव करण्यास अनुमती असेल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी चांगले काम केले असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले. पुढील काही दिवस महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

यावेळी कोविड टास्क फोर्सचे सदस्य आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आवश्यक पूर्वतयारीविषयी आणि कोरोना परिस्थितीविषयी माहिती दिली.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्याची कोरोना परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात 1914 कोविड केंद्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 898 शासकीय तर 1016 खाजगी केंद्र आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर 0.18 टक्के नागरिक बाधित आढळून आले आहेत. दुसरा डोस घेतल्यानंतर 0.22 टक्के नागरिक बाधित आढळले आहेत. जिल्ह्यातील दैनंदिन बाधित रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 98 टक्के तर मृत्यू दर 1.6 टक्के आहे. ‍शिरूर, आंबेगाव, मावळ, जुन्नर आणि दौंड तालुक्यातील आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण प्रस्तावित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीत पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील, यशदा उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, विशेष पोलीस महानिरिक्षक, कोल्हापूरचे मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला स्व. शरद रणपिसे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!