स्थैर्य, मुंबई, दि.२४ : येशू ख्रिस्तांनी जगाला दया, क्षमा, शांती, परोपकाराचा संदेश दिला. संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणासाठी काम केले. येशूंच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समाधान, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणतात की, नाताळचा सण सर्वत्र आनंद, चैतन्य, उत्साहाचे वातावरण घेऊन येतो. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा नाताळ यंदाही उत्साहात साजरा करायचा आहे, परंतु सण साजरा करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे व सुरक्षिततेचे पालन केले पाहिजे. स्वत:चे, कुटुंबाचे, समाजाचे कोरोनापासून संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, ती पार पाडूया, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.