‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, पुणे,दि.७ : ‘कोरोना’ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पुणे शहरातील ‘कोरोना’च्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन झिरो पुणे’ या उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे येथे पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहरामध्ये ‘कोरोना’च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘मिशन झिरो पुणे’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सार्वजनिक हितासाठी या उपक्रमात भारतीय जैन संघटना ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आहे, ही चांगली बाब आहे. या ‘कोरोना’च्या लढ्यात सामान्य नागरिकांनीही साथ देण्याचे आवाहन करुन या उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा म्हणाले, भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्ण शोधण्यासाठी धारावी व  मालेगाव येथे ‘मिशन झिरो’ मोहिम राबबिण्यात आले. पुणे शहरात फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून अँटीजन चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये दररोज अंदाजे 3 ते 5 हजार कोरोना चाचण्या करण्याची क्षमता आहे. कोरोनाविषयी नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रचार व प्रसिध्दीवर भर देण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!