स्थैर्य, मुंबई दि. 4 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाला (एसटी) साडे पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटीसमोरील वाढलेली आव्हाने, महसुलात झालेली घट लक्षात घेऊन एसटी महामंडळाला हा निधी देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात आज ‘एसटी’ महामंडळाच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, वित्त विभागाचे, तसेच एसटी महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एसटीला साडे पाचशे कोटी देण्याचा निर्णय वित्तमंत्र्यांनी जाहीर केला. या निर्णयामुळे एसटी महामंळाच्या समोरील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. बैठकीत एसटी महामंडळाच्या सद्यस्थितीवर चर्चा होऊन आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाला मोठा दिलासा मिळणार आहे.