दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । मुंबई । शापूरजी पालोनजी उद्योग समूहाचे आधारस्तंभ, ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण पालोनजी मिस्त्री यांच्या निधनाने भारतीय उद्योग क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ उद्योगपती पालोनजी मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, शापूरजी पालोनजी उद्योग समूहाला दीडशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. बांधकाम क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळख असणाऱ्या शापूरजी पालोनजी समूहात अभियांत्रिकी, बांधकाम, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, पाणी, ऊर्जा आणि वित्तीय सेवा यांसारख्या व्यावसायिक विभागांचा समावेश आहे. शापूरजी पालोनजी उद्योग समूह जगभरातील पन्नास देशांमध्ये विस्तारला आहे. शापूरजी पालोनजी उद्योग समूह नावारुपाला आणण्यात पालोनजी मिस्त्री यांचा मोठा वाटा आहे. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने देशाच्या उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती शापूरजी पालोनजी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.