स्थैर्य, मुंबई, दि. २ : ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी खासदार, माजी आमदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या निधनानं ग्रामीण विकासाचा ध्यास असलेलं, सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेलं, शेती, सहकाराच्या क्षेत्रातलं तज्ज्ञ, मार्गदर्शक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांचं निधन ही राज्याच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, दहेगावच्या सरपंचपदापासून खासदारकीपर्यंतचा रामकृष्ण बाबा पाटील साहेबांचा प्रवास हा अपार कष्ट, जनसेवेच्या तळमळीचा प्रवास आहे. शेती व सहकाराच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीणविकासावर भर दिला. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी काम केलं. त्यांचं जीवन राजकीय, सामाजिक, कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.