स्थैर्य, मुंबई, दि.२५: “आपल्या सदाबहार आवाजानं भारतीय सिनेसृष्टी समृद्ध करणारे ‘पद्मभूषण’ श्री. एस पी बालसुब्रमण्यम यांचं निधन हा माझ्यासारख्या कोट्यवधी चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. हिन्दीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायलेली चाळीस हजारांहून अधिक गाणी हा भारतीय संगीतातील मोठा ठेवा आहे. हा ठेवा संगीत रसिकांना मनमुराद आनंद तसेच त्यांची आठवण करुन देत राहील. भारतीय संगीत क्षेत्रातल्या या महान, दिग्गज कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसिद्ध गायक एस पी बालसुब्रमण्यम यांना आदरांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, एस पी बालसुब्रमण्यम साहेबांच्या आवाजात जादू होती. या जादूमुळे त्यांना कोट्यवधी चाहते मिळाले. त्यांचे चाहते बहुभाषिक आहेत. चित्रपट सुपरहिट ठरण्यात त्यांच्या गायनाची प्रमुख भूमिका असायची. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.