उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली बारामती येथील विकासकामांची पाहणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ७ मे २०२२ । बारामती । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे उत्कृष्ट, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश  दिले.

श्री. पवार यांनी आज  मौजे बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम, बारामती येथील पोलीस वसाहतीच्या इमारतीचे बांधकाम, दुर्गा टॉकीजच्या समोरील शॉपिंग कॉम्प्लेक्स, शादी खान येथील नदीवरील बांधकाम, बाबूजी नाईक वाडा आणि दशक्रिया विधी घाटा शेजारील कऱ्हा नदीवरील गॅबियन वॉल इत्यादी ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी  केली.

यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, तहसिलदार विजय पाटील,  मुख्याधिकारी महेश रोकडे,  गटविकास अधिकारी अनिल बागल,   सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता अनिल ढेपे,   पाटबंधारे विभागाचे  कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर आदी उपस्थित होते.

 लॉन टेनिस स्पर्धेचे उद्घाटन

जिल्हा क्रीडा संकुल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष सुंदर अय्यर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी महादेव कासगावडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश धावले आदी उपस्थित होते.

आय. एस. ओ. 9001-2015 आणि आय. एस. ओ. 28000-2007 प्रमाणपत्र वितरण

बारामती तालुक्यात 220 स्वस्त धान्य दुकाने कार्यरत आहेत. त्यापैकी 180 स्वस्त धान्य दुकाने, तहसिल कार्यालय आणि शासकीय धान्य गोदाम यांना आय. एस. ओ. 9001-2015 आणि आय. एस. ओ. 28000-2007 मानांकन प्राप्त झाले आहे.  आज विद्या प्रतिष्ठान येथे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात 5 स्वस्त धान्य दुकानदारांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

तसेच या चांगल्या कामगिरीसाठी तहसिलदार विजय पाटील, पुरवठा निरीक्षण संजय स्वामी,  पुरवठा अव्वल कारकून प्रमिला लोखंडे यांना  श्री. पवार यांच्या हस्ते  प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले.

कारगिल युद्धात शहीद झालेले नामदेव गणपत गडदरे यांच्या पत्नी उषा गडदरे रा. गडदरवाडी यांना शासनातर्फे देण्यात आलेल्या 5 एकर जमिनीचा 7/12 उतारा श्री. पवार यांच्या हस्ते उषा गडदरे याना प्रदान करण्यात आला.

दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र  वाटप

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यासह पुरंदर, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र  वाटप कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. श्री. पवार यांनी प्रातिनिधिक स्वरूपात 8 दिव्यांगांना आज ऑनलाईन प्रमाणपत्राचे वितरण केले. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता चंद्रकांत मस्के, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, पौर्णिमा तावरे, अभ्यागत समितीचे सदस्य सचिन सातव, मिलिंद संगई आदी उपस्थित होते.

दिव्यांग व्यक्तींना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश श्री. पवार यांनी दिले.


Back to top button
Don`t copy text!