दैनिक स्थैर्य । दि.२५ जानेवारी २०२२ । मुंबई । प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयानं जाहीर केलेल्या पोलीस पदकांपैकी 51 पोलिस पदकं महाराष्ट्रातील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणं हा महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामगिरीचा गौरव असून राज्यातील उत्कृष्ट कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर केंद्रानं केलेलं शिक्कामोर्तब आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पोलीस पदक’विजेत्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. राज्यातील ‘पोलीस पदक’विजेते अधिकारी-कर्मचारी यापुढेही उत्कृष्ट कामगिरी करतील, सहकारी अधिकाऱ्यांना प्रेरणा देतील, महाराष्ट्राचा गौरव वाढवतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांचे अभिनंदन करतांना व्यक्त केला आहे.
उत्कृष्ट पोलिस सेवेसाठीचं ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम) जाहीर झालेले, अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. विनय महादेवराव कोरगावकर, धुळ्याच्या एसआरपीएफ, गट 6 चे कमांडंट श्री. प्रल्हाद निवृत्ती खाडे, दौंड-पुण्याच्या पीटीसी नानवीज येथील पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत रामभाऊ गुंडगे, नांदेड येथील पोलीस उपनिरिक्षक श्री. अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे. ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम) जाहीर झालेल्या देशातील एकूण 88 विजेत्यांपैकी चार महाराष्ट्रातील आहेत. ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) जाहीर झालेल्या देशातील एकूण 189 विजेत्यांपैकी सात, ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झालेल्या 662 विजेत्यांपैकी 40 महाराष्ट्रातील आहेत. ही बाब निश्चितच अभिमानास्पद असल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र पोलिस आपली ही कामगिरी यापुढच्या काळात अधिक उंचावतील, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांनी राज्य पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.