दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२१ । सातारा । एकीकडे करोना स्थितीने सर्वांना हैराण केले असतानाच गेल्या तब्बल चार महिन्यांपासून जलसंपदा सातारा येथील यांत्रिकी विभागातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनच मिळाले नाही. यामुळे या सर्वांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून आमचे चार महिन्यांचे वेतन त्वरित अदा करावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जलसंपदा विभागाचे कृष्णानगर येथे कार्यालय आहे. यामध्ये यांत्रिकी विभागात 100 च्या वर अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. सप्टेंबर 2021 पासून या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मासिक वेतनच अदा करण्यात आलेले नाही.
यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी, कर्जाचे हप्ते, घरभाडे, वीज बिले, पाणी बिले, दुकानदारांची उधारी थकली असून वेतनाबाबत जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता सेवा सातत्य प्राप्त झाल्यानंतर वेतन दिले जाईल. तुम्ही मंत्र्यांना भेटा, असे सांगितले जात आहे.
मात्र, सेवा सातत्य हे मुंबईत मंत्रालयात प्रलंबित आहे. ते आज होईल, उद्या होईल अशी उत्तरे मिळत आहेत. गेल्या चार महिन्यापासून वेतनच अदा करण्यात न आल्याने दसरा, दीपावली सण सुध्दा कर्मचाऱ्यांना साजरे करता आले नाहीत. बँकांच्या कर्जाचे हप्त थकलेत, त्यावर चक्रवाढ व्याज वाढत आहे. घरगुती खर्च, दवाखान्याचा खर्च अशा अनेक अडचणी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना सोसाव्या लागत आहेत.
चार महिन्यापासून वेतन अदा नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गुरुवारी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. थकीत वेतन तातडीने अदा करण्याची मागणी केली. त्यावर शेखर सिंह यांनी सर्व माहिती घेवून संबंधितांना सूचना करुन वेतन अदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
यावेळी कर्मचारी वैशाली पाटील, शाजी कोलमपरबल, शिवाजी बोधले, मुसा मुजावर, रामदास गायकवाड, लक्ष्मण सुळके, महादेव पाटील, संतोष मिसाळ, अमोल चव्हाण, युवराज शिंदे, लीना कोलमपरबल, प्रवेश खुळे, विजय नडे, विजय रणदिवे, सलीम सरकावस, श्रीधर माने, आरती कांबळे, मुकुंद कांबळे, सोमनाथ पोतदार, मंदाकिनी इंगळे तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.