स्थैर्य, सातारा, दि. २९ : करोना प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या विविध सर्वसामान्य जनतेच्या समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर निदर्शने करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, करोना प्रादुर्भावाचा काळात लॉकडाऊन सारखा पर्याय ठीक होता. परंतु शासनाने मोठय़ा प्रमाणावर चांगल्या आरोग्य सुविधा उभ्या करण्यावर भर देण्याऐवजी सतत लॉकडाऊनचा पर्याय शोधला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनाशी लढा द्यावा लागला. त्या बाबतीत मात्र सरकारने कोणताही दिलासादायक निर्णय घेतला नसल्याने सर्वसामान्य जनता मात्र उद्ध्वस्त झाली. जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून लॉकडाऊन नको चांगली शाश्वत आरोग्य सुविधा द्या, असे मागणी होऊ लागली आहे.
जनतेला मुक्त जगण्याचा अधिकार देण्याची गरज असून गेल्या पाच महिन्यांमध्ये ज्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या सोडवण्यासह आर्थिक घडी व्यवस्थित होण्यासाठी जनतेला पूर्वस्थितीत आणणे गरजेचे आहे. गेली पाच महिने सर्वसामान्य जनतेला रोजगार, व्यवसायापासून वंचित राहावे लागले आहे. त्यांना रोजच्या जगण्यासाठी स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, डाळ, खाद्यतेल, साखर, साबण इतर जीवनावश्यक वस्तू परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत देण्यात याव्यात. रिक्षा व प्रवासी वाहतूक यांना दिलासा देण्यात यावा.रिक्षा आणि प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्याचे हप्ते व वर्षभराचे हप्ते शासनाने माफ करावे. रोड टॅक्स, आरटीओ पासिंग व इतर चार्जेस माफ करावेत, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. चंद्रकांत खंडाईत, सुनील त्रिंबके, बाळकृष्ण देसाई, संदीप कांबळे, सुधीर काकडे, श्रीरंग वाघमारे, वसंतराव खरात, बापू निकाळजे, शशिकांत खरात यावेळी उपस्थित होते.