वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाची विविध पथके तैनात; जाग्यावरच केले जात आहे औषधोपचार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । सातारा । संतश्रेष्ठ श्री  ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम जिल्ह्यात 6 दिवस आहे. या मुक्काच्या कालावधीत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना जाग्यावरच औषधोपचार केले जात आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काल लोणंद येथे मुक्कामी आला असून या पहिल्याच दिवशी साडेचार हजार वारकऱ्यांवर औषधोपचार करण्यात आले,  अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार यांनी दिली आहे.

पालखी मार्गावर आरोग्य विभागाकडून 21 स्थायी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामार्फत आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.  संर्पदंश, कुत्रे चालवण्यानंतरची लस, कोविड लसही वारकऱ्यांसाठी आरोग्य पथकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

तात्काळ सेवा देण्यासाठी विशिष्ट अशी  कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. यामुळे कोणताही गरजु  वारकरी औषधोपचारापासून वंचित राहणार नाही. त्याचबरोबर 17        आरोग्य दुतांची फिरते पथक तयार करण्यात आली आहे. या पथकांमार्फत सर्व दिंड्यांना भेट देवून आजारी वारकऱ्यांची तपासणी करुन जाग्यावरच औषधोपचार करण्यात येणार आहेत. तसेच वारकऱ्यांना आरोग्य शिक्षणही दिले जात आहे. कोविड टेस्ट करण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पालखी मार्गावर 34 पाणी शुद्धीकरण पथके  तैनात करण्यात आली आहेत. यांच्यामार्फत पालखी मार्गावरील विहिरी व टँकरमधील पाण्याचे नमुने तपासणी करण्यात येत आहे. तसेच मार्गावरही हॉटेलमधील पाण्याची तपासणीबरोबरच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत. पालखी सोहळ्यात महिलांचाही मोठा सहभाग असतो ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने महिलांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक पथकात स्त्री वैद्यकीय अधिकारी यांचीही नेमणुक करण्यात आली आहे. तसेच स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाकडूनही विशेष पथक तैनात करण्यात आले आहे असेही डॉ. पवार यांनी सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!