सेवागिरी महाराजांच्या दिंडीचे २ जुलैला प्रस्थान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२२ । सातारा । श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने शनिवार २ जुलै ते सोमवार ११ जुलै दरम्यान आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुक्काम, अल्पोपहार, जेवण, आरोग्यसेवा तसेच औषधपाण्याची मोफत सोय करण्यात आली आहे. या दिंडीत पुसेगाव व पंचक्रोशीतील अधिकाधिक वारकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन संतोष (बाळासाहेब) जाधव व विश्वस्तांनी केले.

सेवागिरी देवस्थानच्या पायी पालखी सोहळ्याचे यंदाचे २७ वे वर्ष आहे. शनिवारी २ जुलैला सकाळी ७.३० वाजता श्री सेवागिरी महाराज पालखीचे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे. शनिवार २ जुलैला महिमानगड, रविवार ३ जुलै लोधावडे फाटा, सोमवार ४ जुलै म्हसवड, मंगळवार ५ जुलै पिलीव, बुधवार ६ जुलै भाळवणी, गुरुवार ७ जुलै उपरी, शुक्रवार ८ जुलै वाखरी, शनिवार ९ जुलै पंढरपूर मुक्कामी पोहोचेल. रविवार 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. दिंडी सोहळ्यादरम्यान ठीकठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन, भारुड, हरिपाठ, दैनंदिन आरतीचा कार्यक्रम होणार आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे भाविकांना पालखी सोहळ्याचा अनुभव घेता आला नाही. त्यानंतर दोन वर्षांनी आषाढी पालखी सोहळा होणार असल्याने सेवागिरी ट्रस्टने पायी पालखी दिंडी सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. विश्वस्तांनी दिंडीच्या दुपारच्या जेवणाच्या व मुक्कामाच्या जागांची पाहणी करून उत्तमोत्तम नियोजन केले आहे. पुसेगाव व पंचक्रोशीतील वारकरी मंडळाने या पायी पालखी दिंडीचे संयोजन केले आहे. दिंडीसाठी बाळकृष्ण नाथा जाधव व दिलीप मारुती जाधव यांनी बैलजोडी उपलब्ध करून दिली आहे.

ट्रस्टमार्फत दिंडीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचा अपघाती विमा उतरवला जाणार आहे. सर्व मुक्कामांच्या ठिकाणी निवाऱ्यासाठी अतिरिक्त तंबुंची सोय करण्यात आली आहे. पंढरपूर येथील मुक्कामात वारकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोयिंसुविधायुक्त प्रशस्त निवाऱ्याची सोय ट्रस्ट मार्फत करण्यात आली आहे. दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसठी ट्रस्टचे चेअरमन संतोष (बाळासाहेब) जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.


Back to top button
Don`t copy text!