दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । कऱ्हाड । मानाच्या श्री साईबाबा पालखी सोहळ्याचा शुभारंभ देवदिवाळीच्या मुहूर्तावर येत्या २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता होत आहे. साई चरणी श्रीक्षेत्र शिर्डी येथून प्रस्थान करीत कऱ्हाड येथे दाखल होणाऱ्या या साई पालखी सोहळ्याचे यंदा २२ वे वर्ष आहे. शिर्डीहून कऱ्हाडला पालखी आणत येथील वाखाण रोड परिसरातील श्री दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव सोहळा संपन्न होणार आहे. अशी माहिती श्री साईबाबा पालखी सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष उदयसिंह देसाई यांनी दिली.
देवदिवाळीच्या मुहूर्तावर येत्या २४ नोव्हेंबरला मंगल प्रभात समयी शिर्डीच्या साई मंदिरातील लेंडीबाग (दत्त मंदिर) येथे श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीचे तदर्थ समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी व ग्रामस्थांच्या शुभहस्ते कऱ्हाडकडे पालखीचे दिमाखात प्रस्थान होईल. साईबाबा पालखीचे पिंपरी निर्मळ, कोल्हार, गुहा, राहुरी, नांदगाव (शिगवे), विळद घाट, अहमदनगर, चास, सुपा, वाडेगव्हाण, शिरूर, आंबळे, नागरगाव, सुपा, मुर्टी, निरा, लोणंद, वाठार स्टेशन, पळशी, कोरेगाव, वेलंग, रहिमतपूर, वाठार किरोली, मसूर, विद्यानगर अशा मार्गे १३ दिवसांचा प्रवास करीत ६ डिसेंबरला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कऱ्हाडच्या कृष्णा नाका येथे पालखीचे आगमन होईल.
खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते पालखीचे कऱ्हाडमध्ये भव्य स्वागत होईल. यानंतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कऱ्हाडच्या वाखाण रोड परिसरातील श्री दत्त मंदिरात साई पालखी विसावेल. लगेचच दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबरला दत्त जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येईल. पालखी सोहळ्यातील सहभाग हा निःशुल्क आहे. तरी, श्री साईबाबा संस्थान शिर्डी व समस्त शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने निघणाऱ्या श्री साईपालखी सोहळ्यात आवर्जुन सहभाग घ्यावा. तसेच, साईभक्तांनी ९८६००१९४४१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन उदयसिंह देसाई व साईबाबा पालखी सोहळा समितीने केले आहे. दत्त जयंतीचा महाप्रसाद वाखाण रोड परिसरातील श्री दत्त मंदिरात आयोजिला आहे. तर, श्री साईबाबा पालखी सोहळयात सहभागी साईभक्तांना पालखी मार्गावर सकाळी चहा, नाष्टा, दुपारी भोजन, सायंकाळी चहा, नाष्टा तसेच रात्रीच्या वेळी महाप्रसाद दिला जातो. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पालखी सोहळ्यात कोणत्याही स्थळापासून सहभागी होता येते. तरी, साईभक्तांनी मोठ्या प्रमाणात पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन उदयसिंह देसाई यांनी केले आहे.