सन १९०५ पासून म्हणजे सुमारे ११८ वर्षांपासून केंजळे कुटुंबात माळेची परंपरा असून तेंव्हा पासून हे कुटुंब वारकरी सांप्रदायाशी निगडित आहे. सुमारे ५५ वर्षांपूर्वी या कुटुंबाचे तत्कालीन कुटुंब प्रमुख गणपतराव केंजळे व सौ. लक्ष्मीबाई केंजळे यांनी बैलगाडीतून दिंडी सुरु केली, त्यावेळी दिंडी सोबत सुमारे ७०/८० स्त्री – पुरुष वारकरी, भाविक पायी जात असत. सोबत सामानासाठी बैलगाडी असे. गणपतराव केंजळे यांच्या निधनानंतर ही परंपरा श्रीमती लक्ष्मीबाई केंजळे, त्यांच्या नंतर त्यांचे सुपुत्र सदाशिवराव केंजळे आणि आता त्यांचे चिरंजीव जीवन केंजळे यांनी ही परंपरा अखंडित सुरु ठेवली आहे.
पूर्वी बैलगाडीतून नेले जाणारे साहित्यासाठी आता ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबत पाण्याचा टँकर, १० तंबू, स्वयंपाकाची भांडी व अन्य साहित्य, धान्य, किराणा, मसाले, साखर वगैरे सर्व या ट्रक मध्ये असते. अलीकडे संख्या कमी झाली असून या दिंडीतून सध्या ५०/५२ स्त्री – पुरुष चालतात.
निवृत्त शहर अभियंता जीवन सदाशिव केंजळे, बुवासाहेब गुंजवटे आणि येथील सद्गुरु हरिबुवा मंदिरातील भजनी मंडळ वगैरे मंडळी दिंडीची दैनंदिन व्यवस्था पाहतात. दररोज सकाळी माऊली व पांडुरंगासाठी मिष्टान्न नैवेद्य केला जातो. तेच संपूर्ण दिंडीसाठी भोजन असते. सोहळ्याच्या लोणंद मुक्काम दरम्यान ही दिंडी सरदेच्या ओढ्याकाठी कापडगाव, ता. फलटणच्या हद्दीत मुक्कामास थांबते त्यावेळी माऊली व पांडुरंगासाठी पुरणपोळीचा नैवद्य असतो. त्यावेळी फलटण मधील काही माऊळी भक्तांना आवर्जून भोजनाचे निमंत्रण दिले जाते.
प्रतिवर्षी आषाढी वारी साठी भिशीची योजना असून त्या रक्कमेतून या दिंडीचा संपूर्ण खर्च करण्यात येतो. त्याशिवाय मुंबई येथील ६/७ आणि अन्य १०/१५ कुटुंबे दिंडीसाठी पंगती देतात.
फलटण येथून अशा प्रकारे चौधरवाडी आणि अन्य ठिकाणाहून अशा स्वतंत्र दिंड्याद्वारे तर काही भाविक अन्य ठिकाणच्या दिंड्या मधून आषाढी वारी करतात.