स्थैर्य, त्र्यंबकेश्वर, दि.24 : सूर्यकांत भिसे यांजकडून : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून 50 वारकरी , दिंडीकरी , विणेकरी व मानक-यांच्या उपस्थित श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याने श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
आज (गुरुवार) पहाटे नित्यनेमाने श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधीस पुजा, अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिरात प्रस्थानची तयारी सुरु झाली. मुख्य मंदिराच्या सभामंडपात पालखी सजविण्याचे काम सुरु झाले. सुंदर फुलांनी पालखी सजविण्यात आली. मानकरी, विणेकरी व दिंडीप्रमुखांना प्रशासकांच्या हस्ते नारळ प्रसाद देण्यात आला. सकाळी 10 वाजता प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. यावेळी टाळ मृदुंगाच्या सहाय्याने भजन संपन्न झाले.
धन्य धन्य निवृतीदेवा,
काय महिमा वर्णवा ॥
समाधी मंदिरात प्रशासक के.एम. सोनवणे यांच्या हस्ते प्रस्थान पूजा झाल्यानंतर सच्चीदानंद गोसावी यांच्या हस्ते आरती करण्यात आली व सकाळी 10 : 30 वाजता पादुका सुंदर फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान झाल्या. टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीसह मंदिराला प्रदक्षणा घालण्यात आली व सकाळी 11 वाजता प्रदक्षिणा पुर्ण करुन समाज आरती नंतर पालखी सभा मंडपात विसावली.
अत्यंत साध्या पध्दतीने व शासनाचे कोरोनाचे नियम पाळून हा प्रस्थान सोहळा साजरा करण्यात आला. आता हा सोहळा आषाढ शुध्द दशमी पर्यंत त्र्यंबकेश्वर येथे मंदिरातच राहिल असे, ह. भ. प. जयंत महाराज गोसावी यांनी सांगितले.
या प्रस्थान सोहळ्यास सह धर्मादाय आयुक्त जयसिंग झपाटे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त के. एम. सोनवणे, अॅड. भाऊसाहेब गंभीरे, पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे, मुख्याधिकारी संजय जाधव, जयंत महाराज गोसावी, भानुदास गोसावी, मोहन महाराज बेलापूरकर, बाळासाहेब देहूकर, हरिप्रसाद देहूकर, सोपान बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, अर्जुन गाढवे, निवृत्ती चोपदार, रामकृष्ण लहवीतकर, गंगाराम झोले, संदीप मुलाणे, विष्णू बदादे, दादा आचारी यांच्यासह 50 वारकरी, दिंडीकर उपस्थित होते.