राज्यातील सर्व शासकीय शाळा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील – प्रा.वर्षा गायकवाड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ एप्रिल २०२२ । मुंबई । राज्यातील ज्या शिक्षकांना प्रशिक्षणाअभावी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे लाभ मिळाले नाहीत अशा शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी इन्फोसिसची मदत होणार आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि इन्फोसिस यांच्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड आणि सचिव रणजित देओल यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

शिक्षकांना 12 वर्षे आणि 24 वर्षे सेवा झाल्यानंतर वरिष्ठ श्रेणी तसेच निवड श्रेणी लागू होते. तथापि मागील पाच वर्षे प्रशिक्षण कार्यक्रम घेतला नसल्यामुळे हे लाभ देता येत नव्हते. हे प्रशिक्षण देण्याबाबत सातत्याने मागणी होत होती. तथापि, कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे प्रशिक्षण देणे शक्य झाले नाही. या अनुषंगाने आज सामंजस्य करार करण्यात आला असून राज्यातील सुमारे 94 हजार शिक्षकांना या प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. यावेळी एससीईआरटीचे संचालक देवेंद्र सिंग तर इन्फोसिसच्या वतीने कार्यक्रम व्यवस्थापक किरण एन.जी., पुण्याच्या व्यवस्थापक मनोरमा भोई, सहयोगी उपाध्यक्ष सीमा आचार्य, इंजिनिअरिंग अकादमीचे प्रमुख व्हिक्टर सुंदर राज, कॉर्पोरेट घडामोडींचे प्रमुख संतोष अनंथपुरा आदी उपस्थित होते.

राज्यातील सुमारे 44 हजार शाळांमध्ये डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यांचा वापर वाढवून विद्यार्थी तंत्रस्नेही व्हावेत, यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले. कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या काळात प्रत्यक्षात शाळेचे वर्ग भरविणे शक्य नसल्याने विभागाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

भविष्यात राज्यातील शासकीय शाळा डिजिटल करणे, शाळांमध्ये रोबोटिक प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा उभारणे यासाठी तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा सहजरित्या आत्मसात करता यावी यासाठीही इन्फोसिसने सहकार्य करावे, याबाबत शिक्षणमंत्र्यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यावर शालेय शिक्षण विभागास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याबाबत इन्फोसिसनेही सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.


Back to top button
Don`t copy text!