विभाग प्रमुखांनो अभ्यास करून या; आठ दिवसांनी पुन्हा आढावा बैठक घेणार : माजी खासदार रणजितसिंह; नगर परिषदेच्या सर्वच विभागांमध्ये भोंगळ कारभार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ डिसेंबर २०२४ | फलटण | फलटण नगर परिषदेच्या सर्वच विभागांमध्ये भोंगळ कारभार सुरू असून यात लवकरात लवकर सुधारणा करावी. विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाची सखोल माहिती घ्यावी. येत्या आठ दिवसांत पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊ, अशा सूचना माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्या आहेत.

फलटण नगर परिषदेच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृहामध्ये आयोजित आढावा बैठकीदरम्यान माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, मुख्याधिकारी निखिल मोरे, शहर पोलीस निरीक्षक नलवडे यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी फलटण नगर परिषदेच्या बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य व बांधकाम परवाना विभागाची सविस्तर माहिती घेत सर्वसामान्य नागरिकांना ज्या अडीअडचणी भेडसावत आहेत त्या प्राधान्याने सोडवण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

शहरातील सर्व रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करणार

फलटण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण येणाऱ्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये करणार असल्याची घोषणा यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली असून त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा थोडाफार त्रास सहन करावा लागणार आहे. शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करताना प्रत्येक १० मीटर वर पाणी पुरवठा, गटार व इतर गोष्टींसाठी जागा सोडण्यात येणार आहे. त्यामधूनच या सर्व गोष्टी करण्यात येणार आहे, असे यावेळी रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.

शहरात स्वच्छ पाणीपुरवठा झाला पाहिजे

फलटण शहरांमध्ये असणाऱ्या बहुतांश ठिकाणी स्वच्छ पाणीपुरवठा होत नसून त्या ठिकाणी गढूळ व खराब पाणी सोडलेले मी स्वतः बघितले असून आगामी काळामध्ये शहरातील सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा झाला पाहिजे. यासाठी नगरपरिषदेने तातडीने पावले उचलणे गरजेचे असून जर आठ दिवसांच्या आत स्वच्छ पाणीपुरवठा झाला नाही तर नागरिकांच्या रोशाला सुद्धा नगरपालिकेला सामोरे जाऊ लागू शकते, असे यावेळी रणजीतसिंह यांनी सूचित केले.

आठ दिवसात शहराच्या प्रमुख चौकांमध्ये शौचालय उभारणार

फलटण शहरामध्ये तालुक्यासह बाहेरगावावरून अनेक नागरिक ये – जा करीत असतात. त्यांना प्रमुख सुविधा म्हणून शहराच्या प्रमुख चौकांमध्ये फायबरची शौचालय उभी करण्यात यावीत, असे निर्देश आमदार सचिन पाटील यांनी दिल्यानंतर, येणाऱ्या आठ दिवसांमध्ये फलटण शहराच्या प्रमुख चौकांमध्ये स्त्री व पुरुषांसाठी सेपरेट शौचालय उभारणार असल्याची घोषणा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी यावेळी केली.

अनधिकृत बांधकामांची यादी तयार करा

फलटण शहरामध्ये ज्या बांधकाम व्यवसायिकांनी पार्किंगसाठी जागा सोडलेली नाही. त्यासोबतच अनधिकृत बांधकामे केलेली आहेत अशा बांधकाम व्यवसायिकांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासोबतच फलटण शहरांमध्ये असणाऱ्या ओपन स्पेस ची यादी तयार करून त्या ओपन स्पेसची सद्य परिस्थिती सुद्धा सदरील यादीमध्ये तयार करण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून फलटण शहरासाठी विविध विकासकामे मंजूर करण्यात येत आहेत व यापूर्वी सुद्धा मंजूर केलेली विकास कामे ही ओपन स्पेस नसल्यामुळे मार्गी लागलेली नाहीत. त्यामुळे ओपन स्पेस वर नक्की काय प्रकार आहे? याची सखोल चौकशी करण्यात यावी व त्याबाबत योग्य तो अहवाल येणाऱ्या आढावा मीटिंगमध्ये ठेवण्यात यावा, असे निर्देश यावेळी माजी खासदार रणजीतसिंह यांनी दिले.

प्रभाग निहाय ‘प्रशासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवणार

फलटण नगर परिषदेच्या प्रत्येक प्रभागांमध्ये प्रभाग निहाय ‘प्रशासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवण्यात येणार असून त्यामध्ये नगरपालिका प्रशासनाने फलटणकर नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या दारामध्ये जाऊन त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा द्याव्यात. यासाठी नगरपालिकेने विविध सुविधा अर्थात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे अत्यंत माफक असतात त्यामध्ये साफसफाई, नालेसफाई, योग्य तो विद्युत पुरवठा यासह वेळेमध्ये पाणीपुरवठा अशा सुविधा देण्यासाठी प्रशासनाने फलटणकर नागरिकांच्या दारामध्ये जाऊन त्यांना सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश सुद्धा यावेळी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले. आगामी येणाऱ्या आठ ते दहा दिवसांमध्ये संपूर्ण फलटण शहराचा दौरा करून सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा घरबसल्या मिळतील यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी त्यांनी दिली.

शहरातील सर्व रोडलाईट तातडीने सुरू करा

फलटण शहरांमध्ये सुरू असणाऱ्या सर्व रोडलाईट या बहुतांश ठिकाणी बंद असून याबाबत काल मी स्वतः फलटण शहरांमध्ये विविध भागांमध्ये फिरलो असून त्या ठिकाणी रोड लाईट या बंद स्वरूपाच्या आढळलेल्या आहेत. मी स्वतः खासदार असताना खासदार निधी मधून उभारलेले हायमास्ट लॅम्प सुद्धा बंद असून त्याबाबत नगरपालिका उदासीन दिसून येत आहे. आगामी काळामध्ये नगरपरिषदेवरचा लाईट बिलाचा खर्च कमी करण्यासाठी आपण वेगळ्या मार्गाने उपाययोजना करू त्यासाठी नगरपालिकेने कोणतीही चिंता करू नये व नगरपालिकेच्या माध्यमातून तातडीने शहरातील सर्व रोडलाईट हे सुरू करण्यात यावेत, असे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी सर्वसामान्य नागरिकांना रात्रीच्या वेळी भयमुक्तपणे फिरण्यासाठी आपण रोडलाईट बसवलेले आहेत त्यासाठी ते जर आपण बंद ठेवले तर नागरिकांनी रात्रीचे बाहेर पडायचे का नाही असे सुद्धा प्रश्न उपस्थित राहत आहेत. शहरातील सर्व रोडलाईट तातडीने सुरू करण्यात यावेत असे निर्देश यावेळी आमदार सचिन पाटील यांनी दिले.

भुयारी गटार बाबत अधिकाऱ्यांची बोलती बंद

फलटण शहरांमध्ये भुयारी गटार योजनेचे कामकाज सुरू असून त्याबाबत काही निधी प्रलंबित असल्याची माहिती देत असताना माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी नक्की भुयारी गटार योजना आहे की मल निसारण योजना आहे याबाबत अधिकाऱ्यांना खडे सवाल विचारत असताना अधिकाऱ्यांना विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तर सुद्धा देता आली नाहीत. रणजितसिंहांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांची बोलती बंद झालेली होती. यावेळी मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सदरील योजनेची सविस्तर माहिती दिल्यानंतर भुयारी गटार योजना व मल निसारण योजना याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये असणारे प्रश्न अधिकाऱ्यांना सांगितले व दोन्ही योजना कोणत्या अर्थाने वेगवेगळ्या आहेत याबाबतचे तांत्रिक माहिती सुद्धा माजी खासदार रणजीत सिंह यांनी यावेळी दिली.


Back to top button
Don`t copy text!