
दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ‘पत्रकार संरक्षण कायद्या’ची होळी करण्यात आली. फलटण येथे तहसील कार्यालयासमोर फलटण पत्रकार संघाकडून आज दुपारी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून निदर्शने करण्यात आली व पत्रकारांवर होणारे हल्ले थांबवावेत, असे निवेदन फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांना देण्यात आले.
नुकतेच पाचोरा (जि. जळगाव) येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात ४६ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पोलीस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ करत असल्याने हा कायदा सर्वार्थाने कुचकामी ठरत आहे. यामुळेच पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या घटनेनंतर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण पत्रकार संघाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सातारा जिल्ह्यातही सर्व तालुका स्तरावर पत्रकारांनी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन केले.
राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जे या कायद्याचा भंग करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे निवेदन यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले.