
दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२३ । सातारा । जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचार्यांनी संप केला आहे. दुसर्या दिवशी सातारा जिल्ह्यातील कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन नाही तर मतदान नाही, आमच्या मागण्या मान्य करा, कामगार एकजुटीचा विजय अशी घोषणाबाजी केली. तसेच शासकीय काम बंद ठेवून निदर्शने केली. यामुळे सलग दुसर्या दिवशीही अनेक शासकीय कार्यालये ओस पडल्याचे चित्र होते.
राष्ट्रीय पेन्शन स्कीम (एनपीएस) रद्द करून जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करावी या मागणीसाठी शासकीय कर्मचार्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या संपात सातारा जिल्ह्यातील विविध 48 संघटनामंधील सुमारे 18 हजार 500 कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपामुळे सर्व शासकीय कार्यालय ओस पडल्याचे चित्र दुसर्या दिवशीही दिसून आले. सर्व राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, पालिका, नगरपंचायत कर्मचारी तसेच अंशकालीन कंत्राटी व रोजंदारी कर्मचारी यांनी बुधवारी आपआपल्या कार्यालयावरून मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला.
यानंतर विविध विभागातील कर्मचार्यांची सभा झाली. यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन नाही तर मतदान नाही, आमच्या मागण्या मान्य करा, कामगार एकजुटीचा विजय असो, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. मागण्या आमच्या हक्काच्या नाही कोणाच्या बापाच्या यासह घोषणांनाही परिसर दणाणून गेला होता.