४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑगस्ट २०२४ | फलटण |
ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीकन्यांनी हिंगणगाव (ता. फलटण) येथे बोर्डो मिश्रण तयार करणे व वापरणे यावर शेतकर्यांना प्रात्यक्षिक दिले.
कृषीकन्यांनी बोर्डो मिश्रण कसे तयार करावे, त्याचे फायदे आणि शेतीत त्याचा वापर कसा करावा याची सविस्तर माहिती देवून प्रात्यक्षिक स्वरूपात एक टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रण तयार करून दाखवले. मोरचूद (कॉपर सल्फेट), चुना (लाईम) आणि पाणी यांच्या प्रमाणशीर मिश्रणास बोर्डो मिश्रण म्हणतात, पी. ए. मिलार्डेट यांनी या मिश्रणाचा वापर द्राक्षांवरील केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी केला होता, इ. माहिती कृषीकन्यांद्वारे शेतकर्यांना देण्यात आली.
बोर्डो मिश्रण हे बुरशीनाशक म्हणून वापरले जाते, ज्यामुळे पिकांचे संरक्षण होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. या मिश्रणाचा उपयोग मुख्यतः फळवर्गीय पिके जसे की आंबा, द्राक्षे, चिकू, बोर, संत्रा इत्यादींवरील बुरशीजन्य रोग जसे की करपा, भुरी, केवडा, डिंक्या आणि इतर बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केला जातो. तसेच द्राक्षावरील केवडा, बटाट्याचा करपा, संत्र्यावरील शेंडेमर, टोमॅटोचा करपा इत्यादी रोगांच्या नियंत्रणासाठी उपयोग होतो.
या प्रात्यक्षिकामुळे शेतकर्यांना बोर्डो मिश्रणाची सखोल माहिती मिळाल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीशा पंडित मॅडम व प्रा. स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे मॅडम, पीक रोगतज्ज्ञ प्रा. पी. व्ही. भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या कु. प्रतीक्षा लोणकर, अनुजा नाळे, संजना वाघमारे, मयुरी सावंत, अर्पिता पावणे, भाग्यश्री बोडके, साक्षी अभंग, शारदा बोराटे यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.