दैनिक स्थैर्य । दि. ०७ एप्रिल २०२३ । नवी दिल्ली । देशाची लोकशाही धोक्यात नाही, तर आपले कुटुंब धोक्यात आहे. अशा शब्दांत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी, नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे. ते उत्तर प्रदेशातील कौशांबी महोत्सव-2023 च्या उद्घाटन कार्यक्रमात जनतेला संबोधित करत होते.
यावेळी गृह मंत्री अमित शाह यांनी गांधी कुटुंबातील कुण्याही सदस्याचे नाव न घेता, संसदेतील गदारोळापासून राहुल गांधी यांच्या लोकशाहीसंदर्भातील वक्तव्यावर जबरदस्त हल्ला चढवला. शाह म्हणाले, “देशातील लोकशाही धोक्यात नाही, तर आपले कुटुंब धोक्यात आहे. आपण ही लोकशाही केवळ जातीयवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचे राजकारण या तिन्हींमध्येच अडकवून ठेवली.
शाह म्हणाले, कालच संसदेचे कामकाज संपले. देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर चर्चा न होता संसदेचे कामकाज संपले, असे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडले नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभागृहाचे कामकाज चालू दिले नाही. कारण राहुल गांधींना अपात्र ठरवण्यात आले. या शिक्षेला राहुल गांधींनी आव्हान द्यावे. पण आपण संसदेच्या वेळेचाच बळी दिला.’
राहुल गांधींचे संसदीय सदस्यत्व रद्द होण्यासंदर्भात बोलताना शाह म्हणाले, गुजरातमधील सुरत येथील न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली. शिक्षा होताच खासदारकी जाते. मग ती व्यक्ती कुणीही असो. आतापर्यंत 17 आमदार आणि खासदारांचे सदस्यत्व गेले आहे. राहुल गांधींचीही गेली आहे. यावर काँग्रेसच्या नेत्यांनी काळे कपडे घालून संसद बंद पाडली. पण, कायद्याचे पालन करणे हा प्रत्येक नागरिकाचा धर्म आहे, हे मी राहुल गांधींना सांगू इच्छितो, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.