स्थैर्य, फलटण, दि. १ : फलटण येथील युवकास महाबळेश्वरला फिरायला जावू असे फोन करून सांगून पाचगणी येथे गेल्यावर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत एक लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी एका युवतींसह फलटणच्या तीन जणांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पाचगणी व फलटणसह सातारा जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे.
या बाबत पाचगणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, फलटण येथे रहात असलेल्या पुण्यातील युवतीने व्हाट्सऍपवरुन कॉलकरुन आपण दोघे महाबळेश्वरला फिरायला जावू, मस्तपैकी एन्जॉय करु असे सांगून महाबळेश्वरला निघाले असताना पाचगणीत येथे एका हॉटेल मध्ये थांबून दोघे बाहेर येत असताना मारुती दिलीप शेलार, अमोल भिमा यमपुरे, सुरज शिवाजी देवकर (सर्व रा. फलटण) हे तेथे आले. त्यांनी वाहन तळामध्ये दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली. तुला बलात्काराच्या गुह्यात अडकवितो असे सांगून एक लाख रुपये खंडणीची मागणी केली. सोबत आलेल्या युवतीनेही तू त्यांना पैसे दे नाहीतर तुला मी खोट्या बलात्काराच्या गुह्यात अडकविन, अशी धमकी दिली. त्यावरुन त्या युवतीसह मारुती शेलार, अमोल यमपुरे, सुरज देवकर यांच्याविरुद्ध शार्दुल खलाटे (वय २२, रा. बिरदेवनगर फलटण) यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक फौजदार कदम करत आहेत.