२१ जूनला गद्दार दिन साजरा करण्यासाठी युनोकडे मागणी करा; दानवेंचे भगत सिंह कोश्यारींना पत्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२३ । मुंबई । राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. भगत सिंह कोश्यारींनी भाजपा आणि शिंदे गटाला साथ दिल्याने उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्ष करत आहे. आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोश्यारींना पत्र लिहिले आहे.

कोश्यारींचा वाढदिवस होता. याचे निमित्त अंबादास दानवे यांनी साधले आहे. ४० गद्दारांनी तुमच्या सहकार्याने गद्दारी केली म्हणून २१ जून हा दिवस जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा व्हावा यासाठी युनोकडे मागणी करा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

आपण महाराष्ट्राचे राज्यपाल असताना अनेकदा भेट झाली. उद्धव ठाकरेंच्या सरकारला वारंवार जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम तुम्ही अविरत चालू ठेवले होते. ते कमी होते म्हणून की काय दिल्लीच्या पातशहाच्या मार्गदर्शनाखाली सूर्याजी पिसाळ – खंडूजी खोपडे यांच्या गद्दारीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात गद्दारीचे पीक फोफवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. २० जून २०२२ रोजी शिवसेना पक्षातून ४० आमदारांनी गद्दारी करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे पाप केले. असे म्हणतात ही गद्दारी जाणून घेण्यासाठी जगातील ३२-३३ देशांनी माहिती घेतली, असा आरोप दानवेंनी पत्रातून केला आहे.

जर अशा गद्दारीने जगातील एवढ्या देशांतील जनतेचे लक्ष वेधले जात असेल तर हा दिवस “जागतिक गद्दार दिन” साजरा होवू शकतो. तो व्हावा म्हणून आपण आपल्या दिल्लीच्या पातशहांमार्फत युनोकडे प्रयत्न करावे, असा टोला दानवेंनी हाणला आहे.


Back to top button
Don`t copy text!