दैनिक स्थैर्य | दि. ५ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण नगर परिषद हद्दीमध्ये राम यात्रेनिमित्त विनापरवाना जम्बो पाळणे लावणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया फलटण या संघटनेकडून मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्याकडे करण्यात आली आहे. कारवाईचे निवेदन देताना संघटनेचे युथ अध्यक्ष, सातारा जिल्हा मंगेश प्र. आवळे, फलटण तालुकाध्यक्ष गणेश घोलप, उपाध्यक्ष विशाल सूर्यवंशी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, फलटणमधील राम यात्रेला महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात फलटण शहरामध्ये येत असतात. यात्रेनिमित्त नाना पाटील चौक, यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे मोठमोठे जम्बो पाळणे लावले जातात. या पाळण्यांमध्ये लहान मुलांपासून ते महिला, वयोवृद्ध हे सगळे लोक बसून आनंद घेत असतात; परंतु हा असणारा पाळणा हा मनुष्य वर्गाला फिरण्यासाठी सक्षम आहे का, याचा सक्षम अधिकार्यांनी परवाना दिलेला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या पाळण्याचा फिरताना अपघात झाला तर होणार्या जीवितहानीस कोण जबाबदार राहणार? याचा विचार करून विनापरवाना असणार्या या पाळण्यांवर तसेच या पाळण्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने तात्काळ हे जम्बो पाळणे बंद करून संबंधित पाळणा मालकांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.