गिरवी येथे ‘कृषी संशोधन केंद्र’ सुरु करावे; अनिल कदम यांची मागणी


स्थैर्य, गिरवी, दि. ०६ ऑगस्ट : फलटण तालुक्यातील गिरवी आणि परिसरातील ८४ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या फळबाग शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी गिरवी येथे ‘कृषी संशोधन केंद्र’ सुरू करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल कदम यांनी केली आहे. शासनाने आणि राहुरी कृषी विद्यापीठाने यासाठी संयुक्तपणे पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अनिल कदम म्हणाले की, गिरवी परिसरातील गावांमधून डाळिंब, पेरू, ड्रॅगन फ्रूट, सीताफळ, आंबा, अंजीर यांसारख्या अनेक फळबागांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. याच भागातील धुमाळवाडी गावाला राज्याचे पहिले ‘फळांचे गाव’ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, अनेक सुशिक्षित तरुण शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय प्रयोग करत आहेत.

या भागातील शेतकरी फळबाग शेतीसोबतच कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय आणि शेळी-मेंढी पालनासारखे पूरक व्यवसायही करत आहेत. या सर्व व्यवसायांना बळकटी देण्यासाठी आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी एका संशोधन केंद्राची नितांत गरज असल्याचे मत कदम यांनी व्यक्त केले. गिरवी येथे कृषी संशोधन केंद्र सुरू झाल्यास या भागातील कृषी क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!