स्थैर्य, वडूज, दि. १३ : वडूज शहरात कोरोना बाधीत रूग्णाचा काही काळ वावर झाल्यानंतर शहरातील काही भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केल्याने छोटय़ा मोठय़ा व्यवसायीकाना आर्थिक फटका बसत आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्राची व्याप्ती कमीत कमी करावी अशी मागणी व्यापायांनी केली. याबाबत आज शहरातील व्यापायांनी तहसिलदार डॉ. सौ. अर्चना पाटील यांच्यापुढे गाहाने मांडले.
शहरातील व्यापायांनी आज तहसिलदार डॉ. पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. गेल्या सहा दिवसांपूर्वी ठाणे येथून आलेला रुग्णाचा काही काळ शहरात वावर झाला होता. त्यामुळे बस स्थानक केंद्र मानून परिसरातील दहिवडी – कहाड रस्त्यावरील हुतात्मा परशुराम विद्यालय, पेट्रोल पंप, पुसेगाव रस्त्यावरील बँक ऑफ इंडिया, वाकेश्वर रस्त्यावरील जुने विश्रामगृह हा परिसर प्रबिंधात्मक क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे. जिह्यात इतर ठिकाणी असे रुग्ण आढळल्यास 100 मीटर क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले जाते. मात्र येथे पाचशे मीटरचा अट्टाहास का? असा सवाल यावेळी व्यापायांनी उपस्थित केला. प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या आवारात राष्ट्रीयकृत बँका, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती ही कार्यालये सुरू आहेत. मग व्यापायांवर अन्याय का ? असा प्रश्नही व्यापायांनी यावेळी उपस्थित केला. तसेच गेली तीन ते चार महिने लॉकडाऊनमुळे व्यापायांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत योग्य तो मार्ग काढून प्रतिबंधात्मक क्षेत्राची व्याप्ती कमीत कमी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तालुका प्रशासनाच्या सुचनांबाबत नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे अशी चर्चाही यावेळी नागरिकांनी केली.कोरोना बाधित रूग्ण सापडल्यानंतर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शहरातील काही भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. नागरी भागांत रूग्ण सापडल्यास सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीत केले जाईल असे तहसिलदार डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच नागरिकांनी शासनाच्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.