स्थैर्य, कराड, दि. 26 : मारुल हवेली गावपोच रस्त्यावरील पुलाचे बांधकाम जुन्या मापानेच सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात ये रे माझ्या मागल्या यासारखीच या पुलाची अवस्था होणार आहे. सध्याच्या पावसाळी व भौगोलिक परस्थितीचा नवीन अभ्यास करून या पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाटण तालुक्यातील मारुलहवेली विभागात रुंद रस्ते डांबरीकरण झाले असून मारुल हवेलीत गावपोच रस्त्याच्या कमानीजवळच्या नवीन पुलाचेही 76 लाख रुपये खर्चाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. हे बांधकाम अधिकारी यांच्याच मनमानीप्रमाणे अंदाजपत्रक तयार करून सुरू असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. जुन्या मापाप्रमाणेच 6 मीटर उंच, 8 मीटर रुंद व 18 मीटर लांबीचा हा पूल बांधण्याचे काम सुरू आहे. पूर्वीप्रमाणेच हा पूल पावसाळ्यात पाण्याखाली जाणार व दुहेरी वाहतुकीस अडथळा होणार आहे.
मुळातच या पुलाची उंची खूप कमी आहे म्हणून सरपंच, ग्रामस्थांनी ठेकेदारास या पुलाची गावच्या रस्त्याबरोबर उंची म्हणजे 10 ते 12 फूट वाढवावी. दुपदरी वाहतुकीसाठी रुंदी दोन फुटांनी वाढवावी अशी मागणी केली आहे. या मागणीप्रमाणे काम झाले नाही तर काम बंद पाडू, असा इशाराही दिला आहे. याच मार्गावर अनेक संपर्क आहेत. अनेक गावची वाहतूक वर्दळ असते. पावसाळ्यात ओढ्याला पूर येतो आणि पुलावर पाणी येवून वाहतूक समस्या निर्माण होतात. त्यामुळे बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी डोळे उघडे ठेवून पुन्हा आराखडा तयार करावा व त्याप्रमाणे पुलाचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे.