गणेशमूर्ती विटंबना प्रकरणी फलटण नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

निरा उजवा कालवा विभागाच्या पूर्वसूचनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या


स्थैर्य, फलटण, दि. १८ सप्टेंबर : निरा उजवा कालव्यात विसर्जित केलेल्या गणेश मूर्तींची विटंबना झाल्याचा आरोप करत, याप्रकरणी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे फलटण शहर प्रमुख श्री. अक्षय तावरे यांनी याबाबत निवेदन दिले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले आहे.

गणेश विसर्जन होऊन अकरा दिवस उलटले तरी, निरा उजवा कालव्यातील गणेश मूर्तींच्या व्यवस्थेकडे नगरपरिषद प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यामुळे मूर्तींची विटंबना झाली असून, या गंभीर प्रकारामुळे गणेशभक्तांमध्ये संतापाची भावना आहे, असे श्री. तावरे यांनी म्हटले आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

विशेष म्हणजे, निरा उजवा कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी गणेशोत्सवापूर्वीच, दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी फलटण नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाला एक पत्र दिले होते. गणेश विसर्जनाच्या दिवशी, म्हणजेच ८ सप्टेंबर २०२५ रोजी, कालवा मुखाजवळून बंद करण्यात येणार असल्याचे या पत्रात स्पष्टपणे नमूद केले होते.

कालवा बंद झाल्यानंतर पाण्याअभावी मूर्ती उघड्या पडून त्यांची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे कालवा बंद झाल्यावर सर्व गणेशमूर्ती एकत्रित करून त्यांचे विसर्जन करण्यात यावे, अशी स्पष्ट सूचना या पत्राद्वारे देण्यात आली होती. मात्र, नगरपरिषद प्रशासनाने या पूर्वसूचनेकडे आणि पत्रातील निर्देशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता हिंदुत्ववादी संघटना करत आहेत. या अक्षम्य चुकीबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


Back to top button
Don`t copy text!