शिरवळ येथील थेट सरपंच लक्ष्मी पानसरे यांना गैरवर्तणुकीप्रकरणी अपात्र करण्याची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, खंडाळा, दि.११: शिरवळ येथील थेट सरपंच लक्ष्मी पानसरे यांना गैरवर्तणुकीप्रकरणी अपात्र करण्याची मागणी पुणे विभागीय आयुक्त, सातारा जिल्हाधिकारी , सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, खंडाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे शिरवळ शिवसेना शहर प्रमुख विजय गिरे यांनी केली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

याबाबत प्रसिध्दीपत्रकामध्ये म्हटले आहे की, शिरवळ, ता. खंडाळा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी झालेल्या निवडणुकीमध्ये लक्ष्मी पानसरे या विराजमान झाल्या आहे.

यावेळी सरपंच लक्ष्मी पानसरे या जनताभिमुख कारभार करतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य शिरवळकरांची होती परंतु, काही दिवसानंतर शिरवळकरांची अपेक्षाही फोल ठरली.

 

यादरम्यान, शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी एककल्ली व मनमानी कारभार करीत शिरवळ याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानावर (गार्डन) मनमानीपणे कोणालाही विश्‍वासात न घेता अवास्तव खर्च केला आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव खंडाळा तहसीलदार यांच्याकडे दाखल करीत 16 डिसेंबर 2019 रोजी अविश्‍वास प्रस्ताव बहुमताने मंजूर करून घेतला आहे. वास्तविकतः अविश्‍वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधितांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले असून अपिलावर सध्या सुनावणी सुरु आहे. 

अविश्‍वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कायद्याच्या तांत्रिक अडचणीमुळे सरपंच लक्ष्मी पानसरे यांचा वारू उधळला गेला असून आता माझे काहीही कोणी बिघडवू शकत नाही, अशा आविर्भावात सरपंच लक्ष्मी पानसरे या कारभार पाहत असून यामध्ये त्यांचे पती सागर पानसरे हे ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये कायम हस्तक्षेप करीत आहेत.

यावेळी शिरवळ ग्रामपंचायतीच्या 28 जून 2019 व 29 जुलै 2019 रोजीच्या मासिक सभेमध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च उद्यानावर न करण्याचा निर्णय झाला असतानाही सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांना विश्‍वासात न घेता व मासिक बैठकीमध्ये चर्चा न करता कायदेशीर बाबींची पूर्तता न करता बेकायदेशीरपणे गार्डनवरील बिले मनमानीपणे अदा केली आहे. विशेष म्हणजे शिरवळमधील 15 ग्रामपंचायत सदस्यांनी खंडाळा पंचायत समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 5 ऑगस्ट 2019 रोजी गार्डनच्या कामावरील अंदाजपत्रक व इतर बाबी करू नये, असे पत्र दिले असतानाही सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी कायदे धाब्यावर बसवत गार्डनचे काम मनमानीपणे पूर्ण करण्याचा घाट घालत गैरवर्तणुकीचा पायंडा पाडत ग्रामपंचायतीचे पैसे ठरावाशिवाय व ठरावाविरुद्ध खर्च करीत ग्रामपंचायत अधिनियमाचा भंग केलेला असल्याने सरपंच लक्ष्मी पानसरे यांना सरपंचपदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही.

त्यामुळे सरपंच लक्ष्मी पानसरे यांना सरपंचपदावरून अपात्र करण्याची मागणी शिवसेना शिरवळ शहरप्रमुख विजय गिरे यांनी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, खंडाळा गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले यांच्याकडे अर्जाद्वारे केली असल्याची माहिती शिवसेना शिरवळ शहरप्रमुख विजय गिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यामुळे शिरवळमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!