स्थैर्य, सातारा, दि.३: स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या योगदानाची दखल त्या काळी ब्रिटिश सरकारनेही घेतली होती. त्यामुळे क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती राज्यात महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता संपूर्ण देशभर महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज (रविवार) नायगांव येथील कार्यक्रमात केली.
जय ज्योती..जय क्रांती…च्या जयघोषात आज नायगांव (ता. खंडाळा) येथे क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, वैशाली नेवसे उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले, महिला शिक्षण दिनानिमित्त राज्य सरकारने ठरविले आहे की प्रत्येक शाळा, महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करावे. तेथे पथनाट्ये, चर्चासत्रे व्हावीत. एकतरी पुस्तक सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्यावरील वाचले पाहिजे, असा कार्यक्रम राबविला जाणार आहे. देशभर महिला शिक्षण दिन तीन जानेवारीला साजरा करावा, अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.