दैनिक स्थैर्य | दि. ९ सप्टेंबर २०२३ | सातारा |
नांदल (ता. फलटण, जि. सातारा) येथील प्रशांत महादेव कारंडे यांनी आपल्या मालकीच्या गट नं. ५४६ या जमिनीत आर. के. चव्हाण इन्फा. या कंपनीने अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून आपल्या जमिनीचे आतोनात नुकसान केल्याची तक्रार फलटणच्या तहसीलदारांकडे केली असून यास जबाबदार मंडलाधिकारी व कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात प्रशांत कारंडे यांनी म्हटले आहे की, माझ्या मालकीचा गट नं. ५४६ हा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळासाठी संपादित असताना कोणत्याही प्रकारची संबंधित विभागाची परवानगी नसताना व त्या गटाची गटफाळणी झालेली नसताना मंडलाधिकारी (वाठार निं.) यांनी चुकीच्या पद्धतीचा अहवाल सादर करून त्या अन्वये माझ्या जमिनीत मुरूमासाठी परवानगी मिळवून आर. के. चव्हाण इन्फा या कंपनीने गौण खनिज उत्खनन करून एक ते दीड महिना क्रशर चालवून माझ्या जमिनीचे आतोनात नुकसान केले आहे. या प्रकरणी मी दोन महिन्यांपासून तक्रारींचा अर्ज देवूनही व वारंवार विनंती करूनसुद्धा आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या प्रकरणी आपण लक्ष घालून या अवैध उत्खनन करणार्यांवर कारवाई करून मला न्याय द्यावा. अन्यथा दहा दिवसांमध्ये मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे, असा इशाराही कारंडे यांनी दिला आहे.