
दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । सातारा । गोळीबार मैदान पोलीस वसाहत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. ही इमारत तात्काळ दुरुस्त करून त्याची डागडुजी करावी आणि पोलीस प्रशासनाने या इमारतीच्या मालकी असल्याने तात्काळ न हरकत दाखला उपलब्ध करून द्यावा अशी मागणी युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदन त्यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांची भेट घेऊन त्यांना सादर केले. या निवेदनात नमूद आहे की, गोळीबार मैदान पोलीस वसाहत येथील शाळेची इमारत अत्यंत धोकादायक आहे. ती नवीन बांधणे आवश्यक आहे. ही इमारत खूप जुनी असल्याने पूर्णपणे मोडकळीला आली आहे. सदरची जागा ही पोलीस खात्याच्या मालकीची असून जिल्हा परिषद प्रशासनाला आपल्याला हरकत दाखल्याची आवश्यकता आहे तो दाखला तात्काळ उपलब्ध करून द्यावा. शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध होणार नाही.
या प्रार्थमिक शाळेमध्ये गोळीबार मैदान विलासपूर या परिसरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आपण ना हरकत दाखला उपलब्ध करून द्यावा अशी मागणी संग्राम बर्गे यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन अजय कुमार बंसल यांनी स्वीकारले. यासंदर्भामध्ये तातडीने मार्ग काढून ना हरकत दाखला उपलब्ध करून दिला जाईल अशा आश्वासन अजय कुमार बंसल यांनी दिला मात्र त्यापूर्वी त्याची तांत्रिक छाननी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संजय सूर्यवंशी संदीप वायदंडे संजय चव्हाण राहुल पाटोळे विनोद डावरे विक्रम पवार दीपक सुतार अतुल पाटोळे व आदित्य शेंडे उपस्थित होते.