नोकरीसाठी पैसे आणि शरीरसुखारी मागणी, जिल्हा परिषदेतील धक्कादायक प्रकार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,लातूर, दि. १२:  वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर नोकरीची मागणी केलेल्या लातुरातील (Latur) एका तरुणीला चक्क लातूरचे समाजकल्याण अधिकाऱ्याने पैसे आणि शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक व गंभीर आरोप तरुणीने केला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाच्या कलमानुसार आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत (Atrocity Act) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र या सर्व प्रकरणात मला फसवलं जात असून या तरुणीनं माझी सुपारी घेतल्याचा प्रतिआरोप समाजकल्याण अधिकाऱ्यांनी केला आहे.

लातूर शहरात राहणाऱ्या या तरुणीचे वडील समाजकल्याण खात्याअंतर्गत असलेल्या मतिमंद विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला होते . 2007 साली त्यांचं निधन झाल्यानंतर या तरुणीनं खासगी नोकरी करत आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि अनुकंपा तत्वावर वडिलांच्या जागेवर नोकरीची मागणी केली. कागदपत्रांची पूर्तता असतानाही समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी नियुक्ती देण्यास टाळाटाळ करत पैसे आणि शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप तरुणीने लेखी स्वरूपात जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे केला. यानंतर पोलिसांत तक्रार दिली .

याप्रकरणात कोणाच्यातरी सांगण्यावरून या तरुणीने आपल्यावर आरोप करत तक्रार दिली असून यामागे मोठी लॉबी असल्याचा दावा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी केला आहे. शिवाय ही तरुणीच वेळोवेळी कार्यालयात येऊन अर्वाच्च भाषेत बोलत असल्याने मीच आधी या तरुणीविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती असंही खमितकरांनी सांगितलं. या शिवाय मोबाईलवर धमक्यांचे मेसेज देखील तरुणीनं केलं असल्याचं खमितकारांनी दाखवलं आहे.

या प्रकरणी कलम 354 आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत . या घटनेचा लवकरच तपास पूर्ण करून योग्य कारवाई केली जाणार असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी सांगितलं आहे. तर जिल्हा परिषदेत अशा प्रकारची हिम्मत कोण करत असेल तर जिल्हा परिषद शांत राहणार नाही असं मत जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केलं आहे. हे प्रकरण पोलिसांत असून पोलीस तपासानंतरच चित्र स्पष्ट होणार असल्याचं देखील केंद्रे यांनी सांगितलं आहे.


Back to top button
Don`t copy text!