
फलटण तालुक्यात वाढलेली गोहत्या आणि गोवंश तस्करी रोखण्यासाठी कत्तलखान्यांवर छापे टाकून संबंधितांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करण्याची मागणी हिंदू समाज आणि गोरक्षकांनी केली आहे. कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 26 मार्च : महाराष्ट्र शासनाने ‘देशी गोवंश’ याला ‘राज्यमाता’ म्हणून घोषित केले असले तरी, फलटण तालुक्यात मात्र राजरोसपणे गोहत्या आणि गोवंशाची तस्करी सुरू असल्याचा गंभीर आरोप ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघ’ आणि ‘समस्त हिंदू समाजा’च्या वतीने करण्यात आला आहे. या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी गो-तस्कर आणि कसाई यांच्यावर थेट ‘मोका’ (MCOCA) अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी आक्रमक मागणी करत गोरक्षकांनी पोलीस प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
या संदर्भात अखिल भारत कृषी गोसेवा संघ, समस्त हिंदू समाज आणि गोरक्षकांच्या वतीने फलटणचे पोलीस उपअधीक्षक (DySP) तसेच शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना बुधवारी (दि. २५ मार्च) एक सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.
विमानतळ परिसरातील मोकाट जनावरे गायब: निवेदनात एका अत्यंत गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यात आले आहे. फलटण येथील विमानतळ आणि आजूबाजूच्या परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे फिरत असायची. मात्र, अलीकडच्या काळात त्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. खात्रीलायक माहितीनुसार, परिसरातील कसाई ही मोकाट जनावरे पकडून त्यांची कत्तल करत असल्याचे समोर आले आहे.
तस्करीचे जाळे पनवेल, मुंबई, पुण्यापर्यंत: फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोवंशाची कत्तल होत असून, गो-मांसाची वाहतूक पनवेल, मुंबई, पुणे आणि सोलापूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये केली जात आहे. या भागात गो-मांस वाहतूक करताना फलटण तालुक्यातील अनेक गाड्या आणि कसाई वारंवार पकडले जात आहेत. असे प्रकार वारंवार घडत असल्याने फलटण पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन पोलिसांची बदनामी होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गोरक्षकांच्या प्रमुख मागण्या आणि इशारा:
-
फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांनी गोहत्या होणाऱ्या सर्व संशयित ठिकाणांवर तातडीने छापे टाकावेत.
-
गो-तस्कर आणि कत्तल करणारे कसाई यांच्यावर कडक कारवाई करत त्यांच्यावर थेट ‘मकोका’ (MCOCA) कलमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावेत.
-
फलटण तालुक्यामध्ये सुरू असलेली गोवंशाची कत्तल तात्काळ बंद व्हावी.
जर पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन फलटण तालुक्यातील गोहत्या थांबवली नाही, तर येत्या १७ मे रोजी समस्त हिंदू समाज, गोसेवक आणि गोरक्षकांच्या वतीने ‘आमरण उपोषण’ करण्यात येईल, असा खणखणीत इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर अखिल भारत कृषी गोसेवा संघ (फलटण तालुका) चे सौरभ सुनील सोनावले, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे ओंकार कापसे, तसेच अक्षय विलास तावरे, गणेश विठ्ठल धनवर, श्रीकांत विजय खटावकर आदींसह अनेक गोसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
