शाहूनगरमध्ये सफाई कर्मचारी आणि घंटागाड्या वाढवण्याची मागणी


दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । सातारा । शाहू नगर परिसरातील हिलटॉप कॉलनी ते एसटी कॉलनी, एसटी कॉलनी ते अजिंक्य बाजार चौक, जगताप वाडी परिसर आणि रामराव पवार नगर या भागांमध्ये किमान तीन घंटागाड्या आणि दहा सफाई कर्मचारी नेमण्यात यावेत जेणेकरून या परिसराची स्वच्छता व्यवस्थित रित्या करता येईल अशी मागणी करणारे निवेदन जय सोशल फाउंडेशनच्या वतीने सातारा पालिकेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी पराग कोडगुले यांना सादर करण्यात आले आहे.

यासंदर्भात कोडगुले यांच्याशी जय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भोसले यांनी दूरध्वनीवरून चर्चा करून ही मागणी केली .पालिका प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की हिलटॉप कॉलनी ते एसटी कॉलनी जगतापवाडी आणि रामराव पवार नगर या परिसरामध्ये तब्बल 30 हून अधिक कॉलनी असून साडेचार हजार लोकसंख्या वसाहतीचा हा भाग आहे.

बऱ्याच भागांमध्ये घंटागाडी येत नसल्याने परिसरात कचरा पडून त्यांचा बकालपणा वाढला आहे, या परिसरामध्ये किमान तीन घंटागाड्या आणि दहा सफाई कामगार असणे अत्यावश्यक बनले आहे. येत्या काही दिवसात पाऊस सुरू झाल्यास सार्वजनिकरीत्या रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे रोगराईचा फैलाव होऊ नये याकरिता वेळीच उपाययोजना होणे आवश्यक आहे मुख्याधिकार्‍यांनी या सार्वजनिक कचऱ्याच्या समस्येतून लक्ष घालून तात्काळ सफाई कर्मचारी आणि घंटागाडी यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनात शेवटी नमूद आहे.


Back to top button
Don`t copy text!