दैनिक स्थैर्य | दि. ०४ नोव्हेंबर २०२१ | फलटण | अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आशा सुपरवायझर यांची शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी रास्त आहे, तथापी शासकीय तिजोरीवर येणारा भार कसा पेलणार हा अत्यंत महत्वाचा व क्लिष्ट विषय कसा सोडविता येईल याबाबत मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही देत या प्रश्नात आपला संपूर्ण पाठींबा तुम्हाला असल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर व तालुक्यातील ११८४ अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, मदतनीस, आशा सुपरवायझर यांना फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट यांच्या माध्यमातून दीपावली किट वितरण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले,
त्यावेळी आ.दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, नगर परिषद बांधकाम समिती सभापती श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, उपसभापती सौ.रेखाताई खरात, माणिकराव सोनवलकर, माजी सभापती वसंतराव गायकवाड, विश्वासदादा गावडे, सौ.रेश्माताई भोसले, सौ.प्रतिभाताई धुमाळ, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, बाळासाहेब ठोंबरे, संजय कापसे, संजय सोडमिसे, श्रीरामचे संचालक महादेवराव माने, बापूराव गावडे, बाबासाहेब खरात सर, संभाजीराव निंबाळकर, बालविकास प्रकल्पाधिकारी एस.एल.इंगळे यांच्या सह विविध संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील कोरोना साथ नियंत्रणासाठी सुरु असलेले प्रयत्न आणि बाधीत रुग्णांवर पुरेसे वैद्यकीय उपचार करण्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आशा सुपरवायझर यांचा मोठा सहभाग असून त्यांनी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालुन, महिला असूनही रात्री/अपरात्री केलेले काम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे नमूद करीत त्यांच्या या कामाला शतश: धन्यवाद दिले पाहिजेत असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
आपल्या मागण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सुरु असलेले प्रयत्न, केलेली आंदोलने किंबहुना मंत्रालयावर काढलेला मोर्चा प्रसंगी सातारा जिल्ह्यातील तुम्हा सर्वांना भेटून दिलासा देण्याची इच्छा असूनही सभापती पदाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यावेळी आपण भेटू शकलो नाही, तथापी त्यावेळी आणि आजही आपला संपूर्ण पाठिंबा तुम्हा सर्वांना असल्याचे स्पष्ट करीत आगामी नागपूर अधिवेशनात त्याबाबत निर्णय घेण्यासाठी आपण शासन स्तरावर ठोस भूमिका घेण्यासाठी राज्य शासनाला निर्देश देण्याचे सूतोवाच यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
प्रारंभी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आशा सुपरवायझर यांच्या मानधन विषयक प्रश्नाची, त्यांच्या मागण्यांची माहिती देऊन या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी त्यामध्ये लक्ष घालण्याची विनंती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना केली.
सभापती श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
दरम्यान कोरोना कालावधीत अहोरात्र काम करताना बाधीत झालेल्या अंगणवाडी मदतनीस सौ.मुक्ताबाई धायगुडे, मिरगाव आणि आशा सेविका सौ.सुप्रिया तुकाराम आवटे, निरगुडी यांचे दुर्दैवी निधन झाले. शासन नियमानुसार असेल ती संपूर्ण शासकीय मदत त्याच बरोबर व्यक्तिशः आपण स्वतः व राजघराण्याच्या माध्यमातून या दोन्ही कुटुंबांना पुरेशी मदत करण्याची ग्वाही देत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दोन्ही सेविकांना श्रद्धांजली अर्पण केली.